जगदाळे, गनबोटे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार   

पुणे : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोटे यांच्या पार्थिवावर गुरूवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळाला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘जलादो जलादो पाकिस्तान जलादो’ च्या घोषणा उपस्थितांनी दिल्या. 
 
संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव काल पहाटे विमानतळावर पोहचले. त्यानंतर सकाळी कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव कोंढवा येथील निवास स्थानी, तर संतोष जगदाळे यांचे पार्थिव कर्वेनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनीही अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सकाळी ११ वाजता  दोघांच्याही पार्थिवावर वैकूंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष जगदाळे यांच्या मुलीने आपल्या पित्याला मुखाग्नी दिला. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशांत जगताप, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे नेत्यांनी गनबोटे व जगदाळे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन दोन्ही कुंटुंबाचे सांत्वन केले. अंत्यदर्शनानंतर ९.१५ वाजता घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. वैकुंठ स्मशानभूमी येथे कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्यावर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांची बरीच वर्षांपासून मैत्री होती, दोघांचेही कुटुंबीय एकत्रच काश्मीरला फिरायला गेले होते. कौस्तुभ गनबोटे यांच्या कुटुंबीयांचा फरसाणचा व्यवसाय होता. त्यामुळे हे कुटुंब पुण्यात प्रसिद्ध आहे. संतोष जगदाळे यांनी त्यांच्या ८६ वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला फिरायला जातोय, लवकर येईन, तुझ्या खास भेट वस्तूही आणतो असे सांगितले होते. मात्र, भेट वस्तूऐवजी आईसमोर मुलाचे पार्थिव पाहायचा दुःखद प्रसंग उभा राहिला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला तेव्हा त्यांच्या कुटुंबियांचा अश्रूचा बांध फुटला. दोन्ही जीवलग मित्रांना अंतिम निरोप देण्यासाठी पुणेकर नागरिकांनी स्मशानभूमीत गर्दी केली. त्यांच्या अंत्यविधी आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. 

हल्ल्यावेळी घातलेल्या कपड्यावरच वडिलांना अग्नी

पर्यटनासाठी पहलगाम येथे कुटुंबासह गेलेल्या संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर गुरूवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत साश्रू नयनांनी अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मुलगी असावरी जगदाळे हिने हल्ल्याच्या वेळी घातलेल्या कपड्यावर आपल्या वडिलांना  अग्नी दिला. तिचे कपडे रक्ताने माखलेले होते. वडिलांना अग्नी देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. 
 

Related Articles